पंजाब, २५ सप्टेंबर २०२०: संसदेत अलीकडं मंजूर झालेल्या दोन कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवारी भारत बंद पुकारला आहे. या निषेधात पंजाब आणि हरियाणामधील आणखी शेतकरी भाग घेणार आहेत. याशिवाय देशातील ३१ शेतकरी संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविलाय.
भारतीय किसान युनियन’नं (बीकेयू) आधीच घोषणा केलीय की’ कृषी बिलाविरोधात भारत बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात येईल. पंजाबमध्ये या विधेयकाला बऱ्याच काळापासून विरोध सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस सुखदेव सिंह यांनी पंजाबच्या दुकानदारांना दुकानं बंद ठेवून भारत बंदवर शेतकर्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन केलंय.
गुरुवारी पंजाबमधील शेतक्यांनी तीन दिवस रेल्वे वाहतूक रोखण्यासाठी मोहीम राबविली. शेतकरी अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर बसले आहेत. सरकारनं त्यांचे म्हणणं न ऐकल्यास १ ऑक्टोबरपासून रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबविली जाईल, असंही पंजाबमधील शेतकऱ्यांनी म्हटलंय.
हरियाणामध्येही अशीच परिस्थिती आहे. हरियाणा भारतीय किसान युनियनचे प्रमुख गुरनाम सिंह यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की, बीकेयू व्यतिरिक्त इतर अनेक शेतकरी संघटनांनी भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. गुरनाम सिंह म्हणाले की, त्यांनी रस्त्यावर आणि राज्य महामार्गावर शांतपणे बसण्याचं आवाहन केलं आहे. गुरनामसिंग यांच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही निदर्शनाचे आवाहन करण्यात आले नाही. सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत धरणे प्रदर्शन दरम्यान कोणालाही हिंसक कामं करण्यास परवानगी दिली जाणार नाही.
भारतीय किसान संघटनेचं म्हणणं आहे की, भारत बंदमध्ये कमिशन एजंट्स, दुकानदार आणि वाहतूकदारांना जास्तीत जास्त संख्येनं सहभागी होण्याचं आणि शेतकर्यांचा प्रश्न उपस्थित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हा बंद पाहून हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी गुरुवारी राज्याच्या उच्च अधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली आणि परिस्थितीची माहिती घेतली. अनिल विज यांनी राज्याच्या डीजीपीला निर्देश दिले की, पोलिस दल कोणत्याही अप्रिय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार असावे. तत्पूर्वी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी कायदा व सुव्यवस्थेची पूर्ण काळजी घ्यावी व कोरोनाच्या सेफ्टी प्रोटोकॉलचे पालन करावं, असं आवाहन केलं.
काँग्रेससह अनेक पक्ष शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा करत आहेत. शुक्रवारी भारत बंदमध्ये लाखो कामगार शेतकऱ्यांसह धरणेत सामील होतील, असं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी गुरुवारी नवी दिल्लीत सांगितलं की, शेतकरी संपूर्ण देशाला पोसतात पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या शेतात हल्ला करीत आहे. भारत बंदला पाठिंबा देत रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी भारत बंदवर शेतकऱ्यांसमावेत उभे आहेत. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते निषेधांमध्ये भाग घेतील. शुक्रवारी प्रत्येक राज्यात निषेध मोर्चा काढण्यात येईल असा निर्णय काँग्रेस पक्षानं घेतलाय. यानंतर २८ सप्टेंबर रोजी प्रत्येक राज्याच्या राज्यपालांना निवेदन देण्यात येईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे