मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादनाचा मोबदला न मिळाल्यास आत्मदहनाचा शेतकऱ्याचा इशारा; १२ वर्षांपासून सुरू आहे लढा

माणगाव (जि. रायगड), ता. १४ जानेवारी २०२३ : कोकणातून मुंबई-गोवा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी कोकणातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याचे काम गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे. या भूसंपादनासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे सुरूच आहे. कुठे भूसंपादन वाद, तर कुठे मोबदल्याचा वाद अजूनही सुरूच आहे. काही शेतकऱ्यांनी त्यांच्या वादासंदर्भात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तर काहींनी न्यायालयातही धाव घेतली आहे. अशीच एक मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादन वादाची घटना गुरुवारी (ता. १२) कोशिंबळे तर्फे तळेगावात
(ता. माणगाव) येथे घडली.

याविषयी अधिक माहिती अशी, की मौजे कोशिंबळे (ता. माणगाव) या गावातील शेतकरी सखाराम दगडू बक्कम व त्यांचे पुत्र प्रमोद सखाराम बक्कम यांनी कोशिंबळे गावाजवळ होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला विरोध केला. त्यावेळेस त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेतकऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले. यावेळी शेतकरी बक्कम यांनी सांगितले, की मौजे कोशिंबळे तर्फे तळेगाव (ता. माणगाव) येथे माझ्या मालकीची सर्व्हे नं.२/९ ‘अ’ व ‘ब’ मिळकत आहे. सदरील मिळकत ही मुंबई-गोवा महामार्गामध्ये भूसंपादनात गेली आहे. वर्ष २०१५ मध्ये आम्हाला मोजणीची नोटीस आली होती. भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याप्रमाणे मोजणी करण्यात आली व आम्हाला १५ दिवसांनंतर तुम्हाला आय वाॅर्डमध्ये सांगू, असे सांगण्यात आले. त्यानंतर शेतकरी सखाराम दगडू बक्कम यांना असे सांगण्यात आले, की तुमचे आय वाॅर्डमध्ये नावच नाही. आमच्या जमिनीचा काही एजंट व शासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून खोटा नकाशा तयार केला व आमच्या जमिनीचा जुना नकाशा प्रशासनाने गायब केला आहे. सदरील जुना नकाशा आम्ही वेळोवेळी मागणी करूनही देण्यात येत नसून आम्हाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात येतात.

त्यानंतर आम्ही प्रांताधिकारी माणगाव यांच्याकडे तक्रार केली असून, यावर त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही; तसेच सदरील मिळकतीचा मोबदला देखील दुसऱ्याच व्यक्तीला देण्यात आला असून, स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी धरून प्रशासनाने फसवणूक करून आमच्यावर अन्याय केला आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही शेतातच आत्मदहन करणार असल्याचे यावेळी शेतकरी सखाराम बक्कम यांचे पुत्र प्रमोद सखाराम बक्कम यांनी ‘न्यूज अनकट’च्या माणगाव तालुका प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया…
उमेश बिरारी (माणगाव प्रांत अधिकारी) : याबाबत माणगावचे उपविभागीय प्रांत अधिकारी श्री. उमेश बिरारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की सदरील शेतकऱ्यांची मिळकत ही मुंबई-गोवा महामार्गालगत नसून ती आतील बाजूस आहे. शेतकऱ्यांकडे मुंबई-गोवा महामार्गासाठी केलेल्या भूसंपादन जागेची कागदपत्रे मागितली असता त्यांच्याकडे तसे कोणतेही पुरावे नाहीत. ज्या शेतकऱ्यांची जागा महामार्गासाठी संपादित करण्यात आली त्यांना शासनाकडून मोबदला देखील देण्यात आला आहे. बक्कम यांची जागा ही महामार्गाच्या आतील बाजूस आहे.

प्रतिक्रिया…
राजेंद्र पाटील (पोलिस निरीक्षक) : माणगावचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की महामार्गाचे काम हे शासनाचे काम असून त्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना समज देण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या जागेबाबत त्यांना योग्य ती समज देऊन सोडण्यात आले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रमोद जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा