नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२०: निषेध करणारे शेतकरी दिल्ली सीमेवर १९ व्या दिवशीही तळ ठोकून आहेत. कोरोनाचा धोका आणि घसरणारा पारा यांच्यामधील त्यांचा मोठा संघर्ष सुरू आहे. भारत बंद आणि सरकारचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर शेतकरी नेत्यांनी आपलं आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी दिल्लीच्या सर्व सीमेवर एक दिवसासाठी उपोषण करणार असल्याचं शेतकरी संघटनांनी म्हटलं आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, तर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. रविवारी नवीन कृषी कायद्यांविरूद्धच्या आंदोलनाला धार देण्याच्या शेतकरी मोहिमेची झलकदेखील पाहायला मिळाली. राजस्थान ते दिल्लीकडं जाणाऱ्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवर थांबविण्यात आलं, तेव्हा शेतकरी तिथेच धरणे लावून बसले. उत्तराखंडमधील काही शेतकर्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन नवीन कृषी कायद्यांचं समर्थन केलं.
मात्र, रविवारी दिल्लीच्या सिंधू सीमेवर आयोजित पत्रकार परिषदेत या आंदोलनाच्या रोडमॅपबाबत त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली. शेतकरी नेत्यांच्या बैठकीत सिंधू, टिकरी, पलवल, गाझीपूरसह सर्व मुद्द्यांवर शेतकरी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत शेतकरी दिवसभर उपोषण करणार असल्याचं शेतकरी नेते गुरनामसिंग चिडोणी यांनी सांगितलं. हे चित्र सर्व जिल्हा मुख्यालयातही बघावयास मिळणार आहे.
शेतकरी नेते शिवकुमार म्हणाले की, शेतकऱ्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. आम्ही तीनही कृषी कायदे मागं घेण्याची मागणी करतो. सर्व शेतकरी नेते एकत्र आहेत. आमच्या चार मागण्या आहेत, असं संयुक्त किसान मोर्चानं निवेदन प्रसिद्ध केलं. प्रथम, तिन्ही कृषी कायदे रद्द केले पाहिजेत. दुसरं म्हणजे, किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) हमीभाव मिळाला पाहिजे. तिसरं प्रस्तावित वीज बिल रद्द करावे व चौथं म्हणजे गवत जाळण्यासाठी शेतकर्यांचं शोषण थांबविलं पाहिजे.
केजरीवाल आणि ठाकरे शेतकऱ्यांच्या बाजूनं
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पुढं आले आहेत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सोमवारी एक दिवसाचा उपोषण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. लोकांना उपोषण करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते म्हणाले की, प्रत्येकानं आपल्या घरात एक दिवस उपवास ठेवावा आणि शेतकर्यांच्या मागणीला पाठिंबा द्यावा.
ठाकरे यांची भाजपवर टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूनं भाष्य केलं आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले की, कृषी कायद्याविरूद्ध शेतकरी या थंडीच्या हंगामात खुल्या आकाशाखाली दिवस-रात्र आंदोलन करत आहे आणि अशा थंडीतच झोपी जात आहेत. भाजप त्यांना देशविरोधी, पाकिस्तानी आणि खलिस्तानी असं संबोधत आहे. ही आपली संस्कृती नाही. शेतकऱ्यांशी बोलण्याऐवजी भाजप त्यांना पाकिस्तानी, देशद्रोही म्हणत आहे. हे तेच लोक (भाजप) आहेत जे पाकिस्तानातून साखर आणि कांदे आणत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे