नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२१: नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेड काढतील. ट्रॅक्टर परेडसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. परेडवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवली जाईल, तर पोलिसही साध्या गणवेशात हजर असतील. ट्रॅक्टर परेड मार्ग निश्चित झाला असून दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत असेल. दिल्ली पोलिसांनी ३७ अटींसह परेडला परवानगी दिली असून यात ५,००० ट्रॅक्टर भाग घेतील.
सोमवारी गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ट्रॅक्टर परेडपूर्वी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. गृहसचिव, दिल्ली पोलिस आयुक्त, आयबी चीफ, दोन्ही गृह राज्यमंत्री या बैठकीस उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था पाहता गृहमंत्र्यांनी ही बैठक बोलावली होती. दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर परेडची एनओसी मिळाल्यानंतर शेतकरी संघटनांनी १ फेब्रुवारी रोजी संसद मोर्चा काढण्याची घोषणा केली.
१ फेब्रुवारी रोजी संसद मोर्चा
क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे दर्शन पाल म्हणाले की, १ फेब्रुवारीला आम्ही दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणाहून संसदेच्या दिशेने पायी कूच करू. या दिवशी कसे जाऊ याविषयी आम्ही २८ जानेवारी रोजी निर्णय घेऊ. ते म्हणाले की, सर्वसाधारण अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला सादर करावा लागतो. संसदेच्या संपूर्ण अधिवेशनात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत राहू.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे