बुलडाणा जिल्ह्यात भीषण अपघात; चालत्या गाडीचा टायर फुटला; ६ जणांचा मृत्यू

बुलढाणा, १२ मार्च २०२३ : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात रविवारी सकाळी भीषण रस्ता अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. समृद्धी एक्स्प्रेस वेवर कारचा टायर फुटला असून त्यात सहा जणांचा मृत्यू झाला. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला.

एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शिवनी पिसा गावात सकाळी आठ वाजता हा अपघात झाला. कार औरंगाबादहून शेगावच्या दिशेने जात असताना टायरचा स्फोट झाला. टायर फुटल्याचा आवाज इतका मोठा होता की, आजूबाजूचे लोक घाबरले. धावत धावत घटनास्थळी पोचल्यावर एक कार अपघाताची शिकार झाल्याचे दिसले.

कारच्या क्रमांकाच्या आधारे कारच्या मालकाची ओळख पटवली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या नातेवाइकांना माहिती पाठवण्यात आली आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेह घेण्यासाठी नातेवाईक येत आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्रथमदर्शनी अपघाताचे कारण टायर फुटल्याचे दिसते; परंतु पोलिसांचे पथक त्यांच्या वतीने अपघाताच्या कारणाचा तपास करीत आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन केले जाईल. त्यानंतरच ते नातेवाइकांच्या ताब्यात दिले जातील.

घटनास्थळी उपस्थित लोकांशी बोलून पोलिसांनी अपघाताची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. २०२१ च्या सुरवातीला बुलडाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटले. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, डंपरवर लोखंडी रॉड भरलेले होते. मात्र, डंपर अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला. या अपघातात डंपरवरील १६ मजूर गाडले गेले. यात ८ मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर, रुग्णालयात नेत असताना पाच जणांचा मृत्यू झाला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा