गोल पोस्ट इतर पुण्यामध्ये भीषण अपघात; वादळ आणि पावसात होर्डिंग कोसळल्याने ४ महिलांसह ५ जणांचा...

पुण्यामध्ये भीषण अपघात; वादळ आणि पावसात होर्डिंग कोसळल्याने ४ महिलांसह ५ जणांचा मृत्यू

पुणे, १८ एप्रिल २०२३: पुणे जिल्ह्यात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील रावळ किवळे परिसरात मुंबई-पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर लोखंडी होर्डिंग बोर्ड पडला. त्यामुळे खाली उभे असलेले लोक त्यात अडकले. या घटनेत चार महिला आणि एका पुरुषासह ५ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस प्रशासन आणि अग्निशमन विभाग क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग हटविण्याचे काम करत आहे. होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत असल्याने बचावकार्य अजूनही सुरू आहे.

अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानंतर काही नागरिक आसरा घेण्यासाठीहोर्डिंगच्या खाली थांबले. मात्र तेच होर्डिंग कोसळल्यामुळे यावेळी ५ जणांवर काळाने घाला घातला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि सर्व लोकांना रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी, तेथे डॉक्टरांनी पाच जणांना मृत घोषित केले तर दोन जखमींवर उपचार सुरू आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version