बारामती, ६ फेब्रुवरी २०२१: पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार लाटे (ता. बारामती) येथे घडला. याप्रकरणी अंकुश कृष्णा भोई याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पत्नी जयश्री अंकुश भोई यांनी याबाबत फिर्याद दिली. फिर्यादी सध्या बारामतीतील शासकिय महिला रुग्णालयात उपचार घेत आहेत.
भोई दांपत्याने बारामतीत फलटण रस्त्यावर मच्छी खानावळ सुरु केली होती. दि.२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्य़ादी घरी दळण करत असताना पती अंकुश घरी आले. मुलगा अक्षय याने आपल्या हाॅटेलला इंद्रजित भोई यांचे नाव का टाकले नाही, अशी विचारणा करत त्यांनी शिवीगाळ केली. हाताने मारहाण करत डोके भिंतीवर आपटले. मुलीने आरडाअोरडा केल्यानंतरही पतीने मारहाण सुरुच ठेवली. त्यांच्या ताब्यातून सुटका करून घेत फिर्यादीने नातेवाईकाचे घर गाठले.
तेथून सायंकाळी साडे पाचच्या सुमारास फिर्य़ादी ही माळवाडी पाटी येथे आली असताना तिचे पती दुचाकीवरून आले. दुचाकी बाजूला लावत थांब आता तुला मारुनच टाकतो, असे म्हणत हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. साडीचा पदर अोढून तो फिर्यादीच्या गळ्याला गुंडाळून गळा आवळला. त्यामुळे फिर्यादी बेशुद्ध पडल्या.
बेशुद्धावस्थेतील फिर्य़ादीला गावातील हनुमंत राजपुरे हे दुचाकीवरून कोऱहाळ्यात दवाखान्यात नेत असताना पतीने दुचाकी अडवत तिला दवाखान्यात न्यायचे नाही, असे म्हणत दुचाकीवरून खाली अोढत घरी नेले. सायंकाळी मुलगा घरी आल्यावर फिर्यादीला उपचार कामी नेण्यात आले आहे.
न्युज अन कट प्रतिनिधी: अमोल यादव