लातूर- पुणे रस्त्यावर बसचा भीषण अपघात; १४ प्रवाशांची प्रकृती गंभीर

लातूर, १७ जानेवारी २०२३: महाराष्ट्रातील लातूरमधील मुरुडजवळ एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या बस अपघातात ३० हून अधिक जण जखमी झाले असून, यातील १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

मिळालेल्या माहितीनुसार आज (१७ जानेवारी, मंगळवार) सकाळी लातुर-पुणे-वल्लभनगर ही एसटी निलंगा आगारातून निघाली. त्यावेळी चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मुरुड जवळील बोरगाव काळे येथील पुलावरून एसटी बस खाली उतरली. ही बस जोरात आदळल्यामुळे आतमधील प्रवाशी जोरात आदळले गेले. याशिवाय, एसटी बसची पुढील काच पूर्णपणे फुटली आहे. बस पुलावरून खाली कोसळताच बसचा पुढील भाग चक्काचूर झाला. तर प्रवासी गंभीर जखमी झाले. लहान मुलांसह जेष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. एसटीचा अपघात झाल्यानंतर प्रवाशी आतमधून बाहेर आले. अनेकांना दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेतील काही प्रवाशी शेजारीच पडून होते. या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा झाला अपघात ?

बसचा स्टेअरिंग रॉड अचानक तुटला, त्यामुळे चालकाचा तोल गेला आणि बस रस्त्याच्या खाली खड्ड्यात पडली. बसचा पुढील भाग खड्ड्यात जाऊन आदळला. यामुळे चालकही जबर जखमी झाला. स्थानिक लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले बचावकार्य सुरू केले. १०८ वर डायल करून तातडीने रुग्णवाहिका बोलवून जखमी बस प्रवाशांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी पाठवण्यात आले. काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होऊ शकली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा