पुणे: दि. ३ ऑगस्ट २०२० : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने पोटच्या मुलीवर कटरने वार केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या भवानी पेठेत ही घटना घडली आहे. या प्रकरणी खडक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कासेवाडीतील एका २७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी लहान मुलीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. तिने पैसे न दिल्याने तो कटर घेऊन तिला मारण्यास धावला.
यावेळी तक्रारदार तरुणीने हस्तक्षेप केला. त्याने लहान मुलीला हाताने मारहाण केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या मुलीवर कटरने वार करत तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती जखमी झाली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांच्या कोणाच्याही हाताला काम नव्हते. आरोपीही रोजंदारीचे काम करत होता. त्यातच त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी खडक पोलीस अधिक तपास करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे