घरगुती वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून

भंडारा १६ जून २०२३: घरगुती वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या सासऱ्याने कुर्हाडीने वार करून सुनेचा खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी मोहाडी तालुक्यातील रोहणा येथे घडली. पिंकी सतिश ईश्वरकर (वय २५) राहणार रोहणा असे मृत सुनेचे नाव असून बळवंत रघू ईश्वरकर (वय ५५) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे.

आज सकाळी पिंकीचे पती सतिश हे गावात आपल्या किराणा दुकानात गेले होते. त्यांचे वडील बळवंत हे सकाळी दूध घेऊन घरी आले असता, पिंकी अंगणात भांडी घासत होती. तेव्हा दोघांमध्ये वाद झाला, बळवंतने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पिंकीच्या मानेवर जोरदार प्रहार केला. घाव खोलवर गेल्याने पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडली व काही क्षणांत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर स्वतःच मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन बळवंतने घटनेची माहिती दिली. ईकडे बळवंत निघून गेल्याने पिंकीचा मृतदेह तिथेच पडून होता.

मोहाडी पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर पिंकीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर हत्या घरगुती वादातून झाल्याची चर्चा गावात आहे. पिंकीला तीन वर्षांचा मुलगा आहे. मोहाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून भांदविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा