Father wins legal battle to meet daughter after 6 years: आई-वडिलांच्या वादामुळे निरागस मुलांचे कसे हाल होतात, याचे हृदयद्रावक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. गेल्या सहा वर्षांपासून आपल्या चिमुकल्या मुलीला भेटण्यासाठी तळमळणाऱ्या एका पित्याचा न्यायालयीन लढा अखेर यशस्वी झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत या वडिलांना आपल्या लाडक्या लेकीला भेटण्याची परवानगी मिळाली, आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
स्मिता आणि राकेश (बदललेली नावे) यांचा संसार २०१४ मध्ये सुरू झाला. सुरुवातीला सर्व सुरळीत होते, पण २०१९ मध्ये गोंडस मुलगी झाल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. हे वाद इतके विकोपाला गेले की, प्रकरण न्यायालयात पोहोचले. २०१९ मध्ये स्मिताने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दावा दाखल केला, तर २०२१ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. २०१९ पासूनच मुलगी आईकडे होती आणि राकेशला तिला भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती.
मुलीला भेटण्यासाठी राकेशने अनेकदा विनंत्या केल्या, पण त्याकडे दुर्लक्ष झाले. कौटुंबिक न्यायालयातही त्याने भेटीसाठी अर्ज केला, मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. अखेर, राकेशने हार न मानता थेट मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. राकेशच्या वतीने अॅड. लक्ष्मण बिराजदार यांनी प्रभावीपणे बाजू मांडली, त्यांना अॅड. शिल्पा कदम यांनी सहकार्य केले. उच्च न्यायालयाने राकेशची बाजू ऐकून घेतली आणि त्याला मुलीला भेटण्याची परवानगी दिली.हा निकाल अशा अनेक पालकांसाठी आशेचा किरण आहे, जे आपल्या मुलांच्या भेटीसाठी न्यायालयीन लढा देत आहेत. या प्रकरणाने हेच सिद्ध केले की, कायद्याच्या माध्यमातून न्याय मिळतो आणि वडिलांचे प्रेम कधीही कमी होत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे