एफ.सी. रोडवर पोलिसांचा मॉक ड्रिल सराव; आपत्कालीन स्थितीला तोंड देण्याची तयारी

डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एफ.सी. रोडवर आज पोलिसांकडून बॉम्ब ब्लास्ट मॉक ड्रिल सराव करण्यात आला. या सरावाद्वारे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहेत, हे तपासण्यात आले.

मॉक ड्रिलदरम्यान स्फोटाचा आवाज ऐकून काही क्षणांसाठी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र हा डमी ब्लास्ट असल्याचे पोलिसांनी त्वरित स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता शांत राहावे, तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले.

या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे, अचानक बॉम्बस्फोटासारखी घटना घडल्यास पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका सेवा आणि इतर सुरक्षा यंत्रणा किती त्वरेने आणि समन्वयाने काम करतात, याचा आढावा घेणे हा होता. यावेळी वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर गर्दी नियंत्रित करण्याचा सराव केला, तर बचाव पथकाने जखमींची तत्काळ मदत कशी करायची याचाही सराव केला.

डेक्कन पोलिसांनी सांगितले की, अशा मॉक ड्रिल्स नियमितपणे घेतल्या जातात, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस दल आणि स्थानिक यंत्रणा सदैव सज्ज राहतील. नागरिकांनीही या सरावात सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील