भाजीविक्रेत्या दलालांच्या गोडाऊनमुळे ‘कोरोना’ ची भीती वाढली

मांजरी, दि.१०मे २०२० : लॉकडाऊनमध्ये भाजीपाला अत्यावश्यक सेवा आणि शेतकऱ्यांसाठी कोणतीही बंधने नाहीत, हे पाहून अनेक दलालांनी आपला मोर्चा भाजीविक्रीकडे वळविला. गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला पत्र्याचे शेड गोडाऊन म्हणून भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला. मात्र, आपल्यामुळे नागरीवस्तीला त्रास होणार नाही याचे, त्यांना काही सोयरसुतक नाही. मला पैसे कमवायचे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे.

हडपसरमधील लक्ष्मी कॉलनीतून कालव्यालगतच्या रस्त्यावर दलालांनी पत्र्याचे शेड गोडाऊन म्हणून घेतले. मध्यरात्रीपासून शेतकऱ्यांकडून कवडीपाट ते लक्ष्मी कॉलनीदरम्यान भाजीविक्रेत्यांचा बाजार भरतो. मात्र, या ठिकाणी फक्त दलालांनाच संधी असल्याचे दिसून आले. ते कोणाही किरकोळ व्यापाऱ्याला घुसू देत नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे काही दलालांनी सोयीसाठी पत्राशेड गोडाऊन म्हणून घेतले आहे. तेथे शेतमाल उतरवून ठेवायचा आणि नंतर किरकोळ व्यापाऱ्यांनी विक्री करण्याचा उद्योग सुरू केला आहे.

त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा त्रास वाढला. त्याचबरोबर कोरोनाचा विषाणू पसरण्याच्या भीतीने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या दरम्यान, आम्ही मागील पावणे दोन महिन्यापासून गल्लीबोळामध्ये कोणाला येऊ देत नाही, आम्ही स्वतः घरामध्ये थांबून आहोत. मात्र, किरकोळ भाजीविक्रेते आणि दलालांमुळे येथे कोरोना पसरण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.

मध्यरात्री सोलापूर रस्त्यावर प्रचंड भाजीखरेदी करणाऱ्या दलालांचा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची गस्त वाढविल्याने पोलिसांची कुमक आली की, अंतर्गत रस्त्यावर वाहने दामटतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी सोलापूर रस्त्यावरून लक्ष्मी कॉलनीमार्गे कालव्यावरील रस्त्यावर बॅरिगेट लावून एक वाहन जाईल, अशी व्यवस्था केली होती. मात्र, लॉकडाऊन शिथील केल्यामुळे बॅरिगेट काढले गेले आणि वाहनांची वर्दळ वाढली आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.

मंगेश जगताप म्हणाले की, गंगानगर, गोंधळेनगर, सातववाडी फुरसुंगी, भेकारईनगर आदी भागाकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढू लागली आहे. लक्ष्मी कॉलनी परिसरात कामगारवर्ग निवासी आहे. लॉकडाऊन झाल्यापासून सर्व नागरिक घरामध्ये थांबून आहेत. मात्र, भाजीविक्रेत्या दलालांमुळे येथील नागरिकांना त्रास वाढला आहे. भाजी खरेदीसाठी गोंधळेनगर, सातववाडी, गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, आदी परिसरातील किरकोळ व्यापारी येत असल्याने येथे गर्दी वाढत आहे. या ठिकाणी दलालांनी सुरू केलेले गोडाऊन बंद करावेत, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी-ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा