पुरंदर, दि.३जून २०२०: कोरोना संसर्गाची शक्यता निर्माण झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्रातील तिर्थक्षेत्राचा दर्जा असलेली देवस्थाने शासनाचा आदेश निघण्याच्या आधीच बंद करण्यात आली. मात्र ग्रामीण भागातील काही मंदिर आजही उघडी असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता वाढत आहे.
काल परवा पुरंदर तालुक्यातील मांढर येथील पहिला कोरोनाचा बळी गेला. तो व्यक्ती कोठे ही गेला नाही. तर तो एका मंदिराचा सेवेकरी होता. त्या गावात मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे व इतर शहरातून लोक मुळगावी आले आहेत. हे लोक मंगळवार, शुक्रवार या मंदिरात दर्शनासाठी येत होते असे समजते. यावेळी त्या व्यक्तीचे ही दर्शन घेतले जात होते. त्यांना दक्षिणा दिली जात होती. ते पहिलेच आजारी असत पण कोरोना संसर्गामुळे ते निधन पावले. अशीच काहीशी स्थिती पुरंदर तालुक्यातील मंदिरांची आहे. मुख्य गाभारा टाळेबंद असला तरी परिसर व सभामंडपात सहज प्रवेश केला जात आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे व इतर शहरातून लोक मुळगावी आले. हे लोक घरी राहणे अपेक्षित असताना ते देवदर्शन करून येतो म्हणत सहज फेरफटका मारताना दिसतात. हे लोक मंदिर परिसरात घुटमळतात मुख्य गाभारा जरी बंद असला तरी भावनेपोटी एका पायावर उभे राहून वर हात जोडून कळसाचे दर्शन घेतले जात आहे.
गावातील तसेच बाहेर गावाहून आलेले लोक सकाळी मंदीरातील देवाचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडतात आणि परिसरात लोक भेटले की गप्पांचा फड रंगतना दिसतो आहे. हे लोक मंदिरात दर्शनासाठी येतात, सुरवातीला तुळशी वृंदानाला, नंदी, कासव, घंटीला थेट स्पर्श करतात. मुख्य गाभाऱ्याला जरी टाळे लावले असले तरी टाळ्याला हात लावून दवाचे दर्शन घेतले जाते. मंदिराच्या सभामंडपात असलेल्या इतर देव देवतांच्या मूर्ती किंवा पादुकांना थेट स्पर्श केला जात आहे. काही लोक तर मुख्य गाभाऱ्यातील पाणी गोमुखातून बाहेर येते तेथील पाणी ओंजळीत घेऊन थेट पितात. असे एक ना अनेक लोक सर्रास नित्य नियमाने करत आहेत. कोरोना आपल्या गावात येऊच शकत नाही असा फालतू विश्वास यांच्यात आहे. त्यांचे एक उदाहरण म्हणजे पुरंदर तालुक्यातील तिर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा असलेल्या गुळुंचे मंदिराचा गाभारा टाळेबंद केला आहे. पण देवालय परिसर, सभामंडप सरसकट उघडा ठेवला आहे. त्यामुळे लोकांचा सर्रास वावर होतो महाराष्ट्र शासनाचा तिर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा असलेल्या देवस्थानाला जबाबदार पदाधिकारी नसल्याचे दिसून येत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे