अवैधरित्या वर्गणी मागणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करा

35

अहमदनगर, २० एप्रिल २०२३: सण-उत्सवांच्या नावाखाली अवैधरित्या वर्गणी गोळा करून व्यापाऱ्यांना त्रास देणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जबरदस्तीने वर्गणी गोळा करण्यासाठी कोणी तगादा लावल्यास, अशांची तक्रार कोतवाली पोलिस ठाण्यात करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे.

शहरातील जुना बाजार, कापड बाजार, बुरुड गल्ली भागात व्यवसाय करणाऱ्यांना त्रास देवून काही गुंड प्रवृत्तीचे लोक पैशांची मागणी करत असल्याची तक्रार व्यापारी वर्गाने पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली होती. विविध सन-उत्सवाच्या नावाखाली काही ठराविक व्यक्ती कोणतीही पावती न देता वर्गणी गोळा करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

व्यापारी वर्गाकडे अशा प्रकारे वर्गणीचे मागणी करुन त्रास देणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जबरदस्तीने वर्गणीसाठी कोणी त्रास दिल्यास संबंधितांची तक्रार कोतवाली पोलिसांकडे करण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. तसेच ऑनलाईन फसवणूक, वाहतूकीच्या अडचणी, छेडछाडीच्या घटनांवर पोलीस निरीक्षक यादव यांनी जुना बाजार येथील व्यापाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर