अखेर शिंदे गटाला दिलासा.. तर उद्धव ठाकरे यांना झटका

मुंबई, २७ सप्टेंबर २०२२ : दसरा मेळाव्यावरुन झालेलं रणकंदन शिवसेनेने अर्थात उद्धव ठाकरे यांनी जिंकलं. तर सत्ता संघर्षाच्या सुनावणीत कोण जिंकणार, यावर अनेक दिवसांपासून चाललेल्या युद्धला जरासा विराम मिळाला. अखेर शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली. खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार, असा निकाल सुप्रिम कोर्टाने दिला असून त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

शिवसेनेची जी घटना आहे, त्या घटनेनुसार पक्षाचे पदाधिकारी, त्यांचे प्रतिज्ञापत्र, तोंडी पुरावा, शिवसेनेचे विधानसभा आणि लोकसभा यातील लोकप्रतिनिधी कोणाच्या बाजूने आहे, हे बघून निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागेल. तोंडी मनाई आदेशावरुन आता निवडणूक आयोगाला लेखी कारवाई करावी लागेल. असं मत कायदेतज्ञ उज्वल निकम यांनी मांडले.

यावर आता शिंदे गटात आनंदाचं वातावरण आहे. तर उद्धव ठाकरेंना हा मोठा पहिला धक्का आहे. खरी शिवसेना कोण हे निवडणूक आयोग ठरवणार आहे. तसेच चिन्हाबाबतचा निर्णय ही निवडणूक आयोग घेणार असून सगळ्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आता निवडणूक आयोगाला मार्ग मोकळे झाले आहे.
यावर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन सोडले. त्यांनी माध्यमांना सांगितले की, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असून सुरुवातीपासून बहुमत आमच्याकडे आहे. याचा सर्वोच्च न्यायालयाने विचार करुन मगच निर्णय दिला असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. लोकशाहीमध्ये जे अपेक्षित होते, ते आज घडले असं, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यामुळे शिंदे गटाला आता दिलासा मिळाला. किंबहुना हा शिंदे गटाचा पहिला विजय मानला जात आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. आज आम्हाला यश मिळालयं, आम्हाला आनंद झालाय. पण सत्याचा विजय झाल्याची भावना श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली.

घटनापीठाचा निर्णय उद्धव ठाकरे मान्य करणार का? हे पहावं लागेल. आता शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण कोणाला मिळणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा