अखेर मोठ्या वादानंतर फेसबुकनं भाजप आमदाराचं फेसबूक अकाउंट केलं बंद

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२०: तेलंगणातील भाजपचे आमदार राजा सिंह यांच्या फेसबुक वरील वादग्रस्त पोस्ट मुळे काही दिवसांपूर्वी राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा चालू होती. याचं कारण असं होतं की, द वॉल स्ट्रीट ने जुलै महिन्यात दिलेल्या वृत्तानुसार फेसबूक भारतातील भाजप नेत्यांकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त पोस्ट कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, असं सांगितलं गेलं होतं. फेसबुक भारतातील भाजप नेत्यांकडून धार्मिक तेढ निर्माण करणारे तसेच चिथावणी देणारे संदेश पसरवत असताना देखील कारवाई करत नाही, यावरून हा वाद निर्माण झाला होता. मात्र, आता फेसबुक’ने यावर कारवाई केली आहे व राजा सिंह यांचे फेसबुक अकाउंट देखील बंद केलं आहे.

वॉल स्ट्रीट च्या या वृत्तानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर विरोधी पक्षांनी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. भाजप आणि फेसबुक या दोघांची मिलीभगत असल्याचा देखील विरोधी पक्षानं म्हटलं होतं. मार्क झुकरबर्गला यासंदर्भात विचारणाही करण्यात आली होती. त्यानंतर आता फेसबुककडून भाजपाच्या आमदारावर कारवाई करण्यात आली आहे.

“द्वेष आणि हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टमुळे फेसबुकच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल भाजपा नेत्यावर बंदी घालण्यात आली,” अशी माहिती फेसबुकच्या प्रवक्त्याने दिली. बुधवारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीसमोर फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. विरोधकांच्या वाढत्या राजकीय दबावानंतर राजा सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

टी राजा सिंह यांनी गेल्या महिन्यात ट्विटरवरील व्हिडिओमध्ये दावा केला होता की त्यांचे कोणतेही अधिकृत फेसबुक पेज नाही. “अनेक लोकं माझ्या नावाने फेसबुक पेज चालवत आहेत हे मला कळले आहे. माझ्याकडे कोणतेही अधिकृत पेज नाही, त्यामुळे कोणत्याही पोस्टसाठी मी जबाबदार नाही.” असे राजा सिंह यांनी सांगितले. राजा सिंह यांनी त्यांच्याकडे फक्त एक अधिकृत यूट्यूब अकाउंट आणि एक अधिकृत ट्विटर अकाउंट असल्याचा दावा केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा