मुंबई, ३० ऑक्टोबर २०२०: अक्षय कुमारचा चित्रपट लक्ष्मीबॉम्बच्या नावावरून सुरू असलेल्या वादानंतर अखेर चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचं शीर्षक बदललं आहे. पुढच्या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार्या या चित्रपटाचं नाव आता लक्ष्मी असं आहे. अक्षयच्या या चित्रपटाला अलिकडच्या काळात बर्याच वादांचा सामना करावा लागला.
या चित्रपटाला प्रथम लक्ष्मीबॉम्ब या शीर्षकासाठी ट्रोल केलं गेलं होतं, त्यानंतर या चित्रपटावर लव्ह जिहादला प्रवृत्त करण्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर, राजपूत करणी सेनेनं चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. या नोटिसमध्ये या चित्रपटाचं शीर्षक बदलण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे.
या कायदेशीर सूचनेनुसार, ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचं शीर्षक देवी लक्ष्मीचे अगदी अनादर करणारे आहे. लक्ष्मीच्या नावाचा बॉम्बशी संबंध जोडल्यामुळं हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असं या नोटिशीत म्हटलं आहे. तर ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांनीही चित्रपटावर टीका केली आणि विचारलं की, लक्ष्मी प्रमाणं इतर देवांच्या म्हणजेच अल्ला किंवा येशु यांचं नाव वापरून एखाद्या चित्रपटाचं असं नाव का ठेवलं जात नाही?
हा चित्रपट २०११ च्या तामिळ चित्रपटाचा रीमेक आहे. या चित्रपटाचं शीर्षक का बदलण्यात आलं याविषयी बोलताना दिग्दर्शक राघव लॉरेन्स म्हणाले की, तमिळ चित्रपटाचं शीर्षक कांचना चित्रपटाच्या मुख्य पात्रावर ठेवलं गेलं आहे. कांचना म्हणजे सोनं, ज्याचा आई लक्ष्मीशी थेट संबंध आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे