अखेर अनिल देशमुख यांचा राजीनामा, दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे गृहमंत्रीपद

मुंबई, ५ एप्रिल २०२१: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या ‘लेटर बॉम्ब’नंतर अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. सचिन वाझेला गृहमंत्र्यांनी महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याबाबत अ‌ॅड.जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
सुरुवातीला अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर गृहखाते काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहील, असे म्हटले जात होते. मात्र, गृहखात्यासारखे संवेदनशील आणि सामर्थ्यशाली खाते राष्ट्रवादी इतर कोणाच्याही ताब्यात द्यायला तयार नाही. त्यामुळेच राष्ट्रवादीकडून दिलीप वळसे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे. ज्यात दिलीप वळसे पाटील यांच्या गृहमंत्री पदाबाबत देखील उल्लेख केला आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
दिलीप वळसे पाटील यांच्या खात्याचा कार्यभार कुणाकडे?
दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आला आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा