नागपूर, २४ मे २०२३: आशिष देशमुख यांची कॉग्रेस पक्षातून पुढील सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. कॉग्रेसमध्ये सतत वादग्रस्त ठरत असल्याने तसेच कधी राष्ट्रवादी तर कधी भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात असल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वाक्षरीनिशी हे पत्र नागपूरात धडकल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. कॉग्रेसच्या शिस्तपालन समितीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
आशिष देशमुख यांनी काही महिन्यांपूर्वी कॉग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी व कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कॉग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली होती. अलीकडेच आशिष देशमुख आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याचे दिसून येत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी भेटीगाठी वाढल्या होत्या.
पक्ष आपल्याला काढणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. त्यांच्या राजकीय हालचाली पाहून अखेर कॉग्रेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवल्याचे बोलले जात आहे. अर्थातच कधीकाळी काटोल मतदारसंघातून भाजपचे आमदार असलेले देशमुख या कारवाईनंतर नेमकी काय भूमिका घेतात ते कुठल्या पक्षांची वाट धरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर