पाकिस्तानमध्ये अखेर हिंदूचा झेंडा…

कराची, ३० जुलै, २०२२: भारत पाकिस्तान हा वाद जसा आयुष्यभर चालणार आहे, तसाच हिंदू मुस्लीम हा वाद अखेरपर्यंत न संपणारा असावा. पण पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच पोलिस उपअधीक्षक पदी हिंदू महिलेची नियुक्ती होणार असल्याने हिंदूंसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. त्या महिलेचं नाव आहे मनिषा रोपेटा… पाकिस्तानमध्ये अनेक आव्हानांना तोंड देत मनीषा रोपेटा या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. जिथे महिलांना समान न्यायासाठी लढावं लागत आहे, तिथे एका महिलेनं पाकिस्तानात उच्च पदावर पोहोचणं, हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

मनीषा या २६ वर्षांच्या असून त्या सिंध प्रांतातील जकोबाबाद येथील आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जाते आणि सर्वाधिक अत्याचारग्रस्त नागरिक हे पुरुषप्रधान पाकिस्तानमध्ये आहेत, असे त्यांना वाटते. मनीषा यांनी मागील वर्षी सिंध लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. १५२ यशस्वी उमेदवारांच्या गुणवत्ता यादीत त्यांनी सोळावा क्रमांक मिळवला. सध्या त्या प्रशिक्षण घेत आहे आणि त्यानंतर त्यांची लियारी या संवेदनशील भागात पोलिस उपअधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती केली जाणार आहे. मनीषा यांच्या तीन बहिणी डॉक्टर आहेत आणि त्यांचा धाकटा भाऊ वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्या आपल्या आई-भावंडासह कराचीला आल्या. स्त्रीवादी मोहिमेचे नेतृत्त्व करण्यासाठी आणि पितृसत्ताक समाजात लैंगिक समानता निर्माण करण्याचे आव्हान आपण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या गावी मुलींनी उच्चशिक्षण घेणे मान्य नव्हते. जेव्हा त्यांच्या नातेवाईकांना कळले की त्या पोलिस दलात सामील होत आहे. तेव्हा आपण अशा आव्हानात्मक क्षेत्रात जास्त काळ टिकू शकणार नाही, असे त्यांना वाटले होते. परंतु त्यांची ही समजूत चुकीची आहे हे मी दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी महिलांना चप्पल समजले जाते, त्या ठिकाणी एका महिलेने पाकिस्तानात उच्च पदावर स्थानापन्न होणे, ही हिंदु धर्मियांसाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. आता तिथे फक्त त्यांचा टिकाव लागणं आणि त्यांनी स्वत:ला सिद्ध करणं, हे आवश्यक आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा