मुंबई, 20 सप्टेंबर 2021: भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रिफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याला कोल्हापूर जिल्ह्याधिकाऱ्यांनी मज्जाव केला असताना देखील ते कोल्हापूरला रवाना झाले आहेत. ते कोल्हापूरला जाणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये रवाना झाले. मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर सोमय्या पोहोचल्यानंतर मोठा हायव्होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सोमय्या यांची समजूत काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. पण सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते.
पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा होता. ज्यांनी किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर, सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला जाणारचं असं सांगितलं. कोल्हापूरमध्ये येण्यास बंदी आहे, मग मला मुंबईत का अडवलं जात आहे. कोल्हापूरच्या सीमेवर मला अडवलं पाहिजे. हसन मुश्रीफांना वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. किरीट सोमय्या यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांवर टीका केली. मला चार तास घरात डांबून का ठेवलं? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला.
किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात कोल्हापूरमध्ये जाऊन किरीट सोमय्या हसन मुश्रीफ यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत. मात्र ही पोलीस तक्रार होऊ नये यासाठी मला अडवलं जात आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे