अखेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गोव्यात आघाडी

पणजी, 20 जानेवारी 2022: गोव्यासह अनेक राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यादरम्यान गोव्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ होताना दिसत आहे. यापूर्वीच काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना सोबत न घेण्याचा निर्णय घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही पक्षांनी काँग्रेसपुढं आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आता गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा करण्यात आली. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विशेष म्हणजे राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं आघाडी सरकार आहे. हे पाहता आगामी काळात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील हे तिन्ही पक्ष आपला हा पॅटर्न गोव्यातही उतरतील अशी अपेक्षा होती. मात्र काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत येण्यास नकार दिला. त्यामुळं महाराष्ट्र जे चित्र आहे ते आता गोव्यात बघण्यास मिळणार नाही. काँग्रेसच्या या निर्णयामुळं काल शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतलाय.

‘सर्व 40 नाही पण जास्तीत जास्त जागा जिंकू’

गोव्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहेत, तशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. ‘महाविकास आघाडीने गोव्यात एकजुटीने लढावे असा आमचा प्रयत्न होता. त्यासाठी काँग्रेसकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, आमचे प्रयत्न व्यर्थ ठरले. आमच्या प्रस्तावावर काँग्रेसचा होकार अथवा नकारही आला नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेसशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे. गोव्यातील सर्व 40 जागा आम्ही लढणार नाही, पण जास्तीत जास्त जागा आम्ही लढू’, असं पटेल यांनी सांगितलं. उमेदवारांची पहिली यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत आणि तीन-चार दिवसांनंतर दुसरी यादी जाहीर केली जाईल, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संजय राऊतांचा काँग्रेसला टोला

संजय राऊत यांनी यावेळी गोव्यात काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही तिन्ही पक्षांची आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न होता. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर आघाडी झाली. मात्र गोव्यात निवडणूकपूर्व आघाडीसाठी आम्ही प्रयत्न केले. आमचे वरिष्ठ नेते काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलले. मी स्वत: काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केली. मात्र काँग्रेसने त्यास प्रतिसाद दिला नाही. कदाचित गोव्यात स्वबळावर पूर्ण बहुमत मिळेल, असं काँग्रेसला वाटत आहे. त्यावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. आम्ही आता आमचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी गोव्यात एकत्र लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच गोव्यात आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. आमच्याशिवाय सरकार बनणार नाही अशी स्थिती गोव्यात निर्माण होईल. गोव्याची जनता योग्य तो कौल देईल आणि गोव्यातही महाराष्ट्रासारखं एक सक्षम सरकार येईल याचा आम्हाला विश्वास वाटतो, असा दावाही राऊत यांनी केलाय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा