अखेर पिंपरी येथील रेशन दुकानदाराचा परवाना कायम स्वरुपी रद्द; ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

6

पुरंदर, १३ ऑक्टोबर २०२०: पुरंदर तालुक्यातील पिंपरी येथील रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी करीत पिंपरी येथील ग्रामस्थ व सरपंच मीना शेंडकर यांनी सासवड येथील तहसील कार्यालया समोर काल उपोषण सुरू केले होते. अखेर त्या दुकानदाराचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. अशी माहिती सरपंच मीना शेंडकर यांनी दिली आहे.

काल पिंपरी रेशन दुकानदाराने कोरोना काळात नागरिकांना रेशन वाटपात भ्रष्टचार केल्याने त्या दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र दुसरा दुकानदार नसण्याने व कोरोना संसर्गाचा काळ असल्याने प्रशासनाने त्याच दुकानदार पुन्हा दुकान चालवण्यासाठी दिले होते. न्यायालयाने सुध्दा या दुकानदार दुकान चालवण्यासाठी देताना चाळीस दिवसांत पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना प्रशासनाला दिली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास करण्यासाठीच्या सूचना पुरवठा विभागाला दिल्या होत्या. चार महिन्यानंतरही प्रशासनाने याबाबत कोणतीच कार्यवाही न केल्याने काल सरपंचांसह ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर समोर उपोषणाला बसले होते. यानंतर काल सायंकाळी पुरंदरच्या तहसीलदार यांनी रेशन दुकानाचा परवाना कायम स्वरुपी रद्द केल्याचे पत्र सरपंचांना दिले व संबधित दुकानदारावर चार आठवड्यात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर सरपंचांसह ग्रामस्थांनी रात्री उशिरा उपोषण स्थगित केले.

याबाबतची माहिती सरपंच मीना शेंडकर यांनी दिली. लोकांना संकटाच्या काळात सुध्दा वेठीस धरणाऱ्या अशा प्रकारच्या लोकांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. आता त्यांच्यावर कारवाई झाल्याने लोकांना रेशन व्यवस्थित मिळेल. यामुळे इतर दुकानदारांना सुध्दा धडा मिळाला आहे. उशिरा का होईना प्रशासनाने कारवाई केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा