अखेर विश्वास ठराव संमत, २१ ऑगस्ट पर्यंत सभागृह स्थगित

जयपूर, १४ ऑगस्ट २०२०: राजस्थानमध्ये मागील एक महिन्यापासून राजकीय रस्सीखेच सुरू होता. यादरम्यान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडखोरी केली होती. सचिन पायलट भाजपमध्ये जातील की काय अशा चर्चांना उधाण आले असतानाच काल सचिन पायलट राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना जाऊन भेटले.

त्यामुळे या सर्व चर्चा जागीच राहिल्या. त्यात आज विधानसभा अधिवेशनाला देखील सुरुवात झाली आणि आज गहलोत विश्वास ठराव पारित करणार होते. यादरम्यान देखील सचिन पायलट यांना सदनामध्ये सर्वात मागे बसवण्यात आले होते. परंतु, नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार गहलोत सरकार विश्वास ठराव पास करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता काँग्रेसवरील संकट संपल्याचे  चित्र स्पष्ट झाले आहे. हा विश्वास ठराव ध्वनी मतदानच्या सहाय्याने पास केला गेला. ठराव पास होताच काँग्रेस नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. हा ठराव पास झाल्यानंतर आता विधानसभा सत्र २१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

तत्पूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, “आज भाजपचे नेते बगळ्याप्रमाणे पांढरे शुभ्र असल्याचे दाखवत आहेत. परंतु, शंभर उंदीर खाऊन मांजर हज यात्रेला जाते त्याप्रमाणे या नेत्यांची गत आहे. मी ६९ वर्षांचा आहे, ५० वर्षांपासून राजकारणात आहे. मला आज लोकशाहीची चिंता आहे.”  मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले की, “मी विरोधी पक्षातील माननीय नेत्याला सांगू इच्छितो की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मी तुम्हाला राजस्थान सरकार पाडून देणार नाही.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा