श्रीगोंदा, २६ ऑगस्ट २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील काही गावांमध्ये बांधकाम मजूर नोंदणी करण्याचे काम नगर येथील कामगार संघटना अशी संस्था दाखवून एका संस्थेची अध्यक्ष म्हणवून घेणारी महिला गावोगावी फिरून बांधकाम मजूर यांची नोंद करण्यासाठी गोर गरीब जनतेला आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचा गोरखधंदा चालू आहे.
या तथाकथित अध्यक्ष महिलेने तालुक्यात काही एजंट नेमले आहेत. त्यांच्यामार्फत काही अशिक्षित व मजुरांचे कागदपत्रे गोळा करून प्रत्येकी ४०० रुपये फी आकारली जात आहे. प्रत्यक्षात चौकशी केली असता, मजूर नोंदणी फी ८५ रुपये असल्याचे समजले. ही अध्यक्ष महिला लोकांना सांगत आहे की, तुमची नोंद झाल्यावर सरकार तुमच्या खात्यावर दर महिन्याला पैसे पाठवणार आहे. या प्रलोभनाला भुलून काही जण मजूर नसतानाही या महिलेकडे नोंद करण्यासाठी गर्दी करताना दिसत आहेत व फॉर्म भरताना प्रत्येकी ४०० रुपये जमा करत आहेत. याच पद्धतीने प्रत्येक गावात जवळपास ५०-६० हजार रुपये गोळा होत आहेत.
संपूर्ण तालुक्याचा विचार करता खूप मोठी रक्कम गोळा करण्याचे काम चालू आहे. या गोष्टीचा संशय आल्याने मढेवडगाव येथील काही जागृत नागरिकांनी विचारणा केली असता, ही महिला उलट-सुलट उत्तरे देऊन पसार झाली. याबाबत काही नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना बुधवार दि. २६ रोजी अर्ज देऊन या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, गरिबांना भुलवून पैसे उकळण्याच्या प्रकाराला आळा घालण्याची मागणी केली आहे.
अमोल गायकवाड, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय अहमदनगर कर्मचारी यांच्याकडे याबाबत माहिती घेतली तर, त्यांनी असे सांगितले की, बांधकाम मजूर नोंदणी फी पाच वर्षांसाठी फक्त ८५ रुपये असून, आपल्या कार्यालयात बांधकाम मजूर नोंदणी स्वतः नोंदणी करू शकतात. आणि अधिक माहिती विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. कोणत्याही मजुराने खाजगी व्यक्ती वा संस्थांकडे ज्यादा पैसे देऊन नोंदणी करू नये. फसवणूक होऊ शकते असे निर्देश त्यांनी दिले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष