मुंबई २० जून २०२३: मुंबई पोलिसांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माता असित मोदी आणि इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. असित मोदीवर शोच्या एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केला होता, तसेच इतर दोन लोकांनीही तक्रार दाखल केली होती.
या सर्व प्रकरणामुळे शोचे निर्माता असित मोदी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. पोलिसांनी असित मोदी आणि ‘तारक मेहता’शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. या शोमध्ये मिसेस सोडीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच ‘तारक मेहता’चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली, ज्यांच्यावर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरोधात कलम ३५४ आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून असित मोदी यांच्यावर लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप होतायत, शोच्या अनेक कलाकारांनी असित मोदींकडून सेटवरील खराब वातावरणाबद्दल फी भरल्याची तक्रार केली होती.
काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी अभिनेत्रीने पोलिसात जबाबही नोंदवला होता. अभिनेत्रीने सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्याविरोधातही तक्रार केली होती. या अभिनेत्रीने एका मुलाखतीत दावा केला होता की, ती आतापर्यंत गप्प राहिली कारण तिला नोकरी जाण्याची भीती होती. अभिनेत्री गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ‘तारक मेहता’चे शूटिंग करत नव्हती. तिने सांगितले होते की, असित मोदी तिला आक्षेपार्ह मेसेज पाठवत असे आणि अनेकदा खोलीत एकटे बोलवायचे.
न्यूज अनकट प्रतिनीधी- केतकी कालेकर