कोविड रुग्णालयात भीषण आग, ८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

अहमदाबाद, ६ ऑगस्ट २०२०: गुजरातमधील अहमदाबाद मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. चक्क कोविड रुग्णालयाला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये ८ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नवरंगपुरा मधील श्रेय हॉस्पिटलात लागलेल्या या भीषण आगीनं परिसरात एकच खळबळ माजली आहे.

श्रेय रुग्णालयाच्या उर्वरित जवळपास ४० कोरोना बाधित रुग्णांना आता उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटलातील आयसीयू विभागात आग लागल्यानं हा दुर्दैवी प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. हाॅस्पिटलातील या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला आता यश मिळालं आहे.

तसेच ही घटना घडल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेने दु:खी झालो आहे. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि अहमदाबादचे महापौर बिजल पटेल यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासनाकडून सदर घटनेतील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मदत केली जाईल.” असं मोदींनी यावेळेस सांगितलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावर‌ॆ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा