भुसावळ येथे पूर्ववैमनस्यातून गोळीबार ; दोघे गंभीर जखमी

जळगाव, १५ एप्रिल २०२३: पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना भुसावळ तालुक्यातील साक्री फाटा परिसरात असलेल्या शेतात घडली आहे. गोळीबारात अक्षय रतन सोनावणे (वय २६, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय २४, भुसावळ) हे दोघे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुला जवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केला. अक्षय रतन सोनावणे व मंगेश अंबादास काळे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व पोटाला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मंगेश व अक्षय हे दोघे दुचाकीने जेवणासाठी निघाल्यानंतर साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलजवळील एका शेतानजीक तरुणांवर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्याने दोघे तरुण गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती तालुका पोलिसांना कळाल्यानंतर भुसावळचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, भुसावळ तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहनिरीक्षक प्रकाश वानखेडे व तालुका पोलीस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. अक्षय सोनावणे या तरुणाला सुरुवातीला गोदावरीत रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्या पोटात गोळी लागली आहे. तर मंगेश काळे यांच्या डोक्याला गोळी लागली आहे. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे गोदावरी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. पूढील तपास पोलीस करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा