नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२३ : विरोधी पक्षांची महाआघाडी ‘इंडिया’च्या समन्वय समितीची पहिली बैठक बुधवारी नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत जात जनगणना हा प्रमुख मुद्दा बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ४०० लोकसभेच्या जागा शोधून जेथे भाजपच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडीचा उमेदवार सहजपणे उभा केला जाऊ शकतो तर उर्वरित जागांवर आघाडीचे नेते निर्णय घेणार आहेत. जागावाटपासाठी राज्यस्तरीय समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. राज्यात जो पक्ष मजबूत असेल तोच समितीचे नेतृत्व करेल. जागावाटपासाठी ऑक्टोबरची अंतिम मुदत देण्यात आली असुन महाआघाडीची पहिली संयुक्त सभा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भोपाळमध्ये होणार आहे.
सनातन धर्माचा वाद तीव्र झाला असताना राष्ट्रीय स्तरावर भाजपेतर ‘इंडिया’ महाआघाडीने पुन्हा ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न बुधवारी झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीतून केला. राज्यस्तरावर जागावाटपाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून ‘इंडिया’च्या घटक पक्षांच्या नेत्यांची पहिली संयुक्त सभा पुढील महिन्यात भोपाळमध्ये होईल. या सभेतून विरोधकांकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले जाईल.
केरळ व पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये जागावाटपाचा तिढा सुटला नसला तरी, अन्य राज्यांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यावर समन्वय समितीच्या बैठकीमध्ये सहमती झाली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संबंधित घटक पक्षांनी जिंकलेल्या जागा, राज्यातील सद्यस्थिती यांचा विचार करून जागावाटपाचा प्रश्न सोडवला जाईल. तसेच या चर्चेमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला जागावाटपामध्ये झुकते माप मिळेल. राज्या-राज्यांमध्ये समन्वय समिती स्थापन केली जाणार असून त्यामध्ये जागावाटपावर प्राथमिक चर्चा होईल, त्यानंतर केंद्रीय समन्वय समितीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ‘राज्यस्तरावर जागावाटपाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल’, असे समितीचे सदस्य व काँग्रेसचे संघटना महासचिव के.सी.वेणुगोपाल यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. सद्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तीव्र होत असून मराठा- ओबीसी या नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पार्श्वभूमीवर ‘इंडिया’च्या घटक पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर जातनिहाय जनगणनेची मागणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. समन्वय समितीच्या बैठकीत जातगणनेच्या मुद्दय़ावर सहमती झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीतच नव्हे तर, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही हा प्रचाराचा मुद्दा बनवला जाण्याचे संकेत इंडिया आघाडीने दिले आहे.
सनातन धर्म वादावर भाष्य नाही
सनातन धर्माच्या मुद्द्याशी संबंधित वादावर ‘इंडिया’ आघाडीकडून कोणतेही वक्तव्य केले जाणार नाही. यावर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी आघाडीची भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारी अजेंडा चालवणाऱ्या टीव्ही अँकर आणि वाहिन्यांची यादी तयार करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असे १२ हून अधिक अँकर आणि चॅनल्स आहेत. त्यांची यादीही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ‘इंडिया’ आघाडीचा कोणताही नेता अशा अँकर आणि वाहिन्यांच्या डिबेटमध्ये जाणार नाही. विधानसभा निवडणुकीत ‘इंडिया’ अाघाडी नसेल. ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार निवडताना दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या उमेदवारांची संपूर्ण यादीही तयार केली जाणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे