मांडवी बंदरातील गाळ काढण्याचे भिजत घोंगडे, मच्छिमार करणार बेमुदत उपोषण

रत्नागिरी १० जानेवारी २०२४ : गेल्या दहा पंधरा वर्षांपासून रत्नागिरीमधील भाट्ये खाडीच्या मुखाजवळील गाळाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरात गाळ साचल्याने त्या खाडीमध्ये ये-जा करण्यासाठी मच्छिमारांना भरती-ओहोटीची प्रतिक्षा करावी लागते. या भागात अनेक अपघात घडून काही मच्छीमारांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे येथील मच्छिमार सातत्याने गाळ उपसण्याची मागणी करतायत. परंतु प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासनेच दिली जात असल्याने येत्या २६ जानेवारीला प्रजाकसत्ताक दिनी मच्छीमारांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याची माहिती मच्छीमार कमिटी ने माध्यमांना दिली. या संदर्भात मंगळवारी (दि. ९ जानेवारी २०२३) जमातूल मुस्लिम राजीवडा कोअर कमिटीच्या वतीने मच्छीमारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

भाट्ये खाडी परिसरातील राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आदि गावातील रहिवाशांचा मुख्य व्यवसाय मासमारी आहे. येथील मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाण्याचा मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. या बंदरात वाळू साचल्याने मच्छीमारांचा समुद्रात ये-जा करण्याचा मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहे. तसेच मांडवी बंदरात अनेक नौकाचे अपघात होऊन खलाशी बुडून मृत्यू पावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे गेली कित्येक वर्षे मांडवी बंदरातील गाळ काढण्याची मागणी आहे. मात्र, या गाळाचा प्रश्न जैसे थे आहे.

भाट्ये खाडीच्या परिसरातील राजिवडा, कर्ला, जुवे, भाट्ये आणि फणसोप येथील मच्छिमारांना समुद्रात जाण्यासाठी मांडवी बंदराचे मुख हा एकमेव मार्ग आहे. भाट्ये खाडीचे मुख असलेल्या मांडवी बंदरासह संपूर्ण खाडी परिसर गाळाने भरला आहे. त्यामुळे मच्छिमारांना भविष्याची चिंता सतावत आहे. हा गाळ उपसा झाल्यास मच्छिमारांची मोठी समस्या दूर होणार आहे. हा गाळ उपशाबाबत मच्छिमारांनी अनेकदा शासनाकडे लेखी निवेदने सुद्धा दिलेली आहेत. मात्र तरीही शासनाने हा प्रश्न गांभीर्याने न घेता त्याकडे कायम दुर्लक्ष केलेले पाहायला मिळत आहे. मच्छिमारांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाला गांभीर्य आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

दरम्यान, गाळ काढण्याचे कामाबाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासने देण्यात आली. मात्र, त्यांची पूर्तता झालेली नाही. हा गाळ साचल्याने मच्छिमारांच्या अस्तित्वाचा, जिवितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत गाळ उपसण्याचे कामाचा शुभारंभ न झाल्यास नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग पत्करावा लागणार आहे, असे लेखी निवेदन यापूर्वी प्रशासनाला जमातुल मुस्लीमिन राजिवडा कोअर कमिटी पुरस्कृत मच्छीमार संघर्ष समितीने दिले होते. त्या निवेदनाची दखल न घेतल्याने नाईलाजास्तव गरीब मच्छीमारांना न्याय मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागत आहे. मच्छीमारांच्या वतीने दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पालकमंत्र्यांनी दिले होते आश्वासन
पालकमंत्री उदय सामंत यांनी जूनमध्ये झालेल्या जनता दरबारात मच्छिमार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना ऑक्टोबर, २०२३ मध्ये गाळ उपसा करण्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पालकमंत्र्यांच्या या आश्वासनपूर्तीकडे मच्छिमारांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र पालकमंत्र्यांनी दिलेले आश्वासन हवेत विरले. त्यामुळे नाईलाजास्तव गरीब मच्छीमारांना न्याय मागणीसाठी उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागला आहे.

मच्छीमारांचे हाल संपणार तरी कधी?
भाट्ये खाडी आणि मांडवी बंदराच्या दरम्यान साचणाऱ्या गाळाची समस्या गेल्या अनेक वर्षापासून मच्छीमारांना भेडसावत असून लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या खैरातीमध्ये ती अधिक जटील होत चालली आहे. मच्छीमारांना जीव धोक्यात घालून आपल्या नौका समुद्रात घेऊन जाव्या लागत असल्याने, मच्छीमारांचे हे हाल संपणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा