राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरस मध्ये जाण्यास परवानगी

नवी दिल्ली, ३ ऑक्टोंबर २०२०: हाथरस प्रकरणावरून सध्या सर्व देशभरात आक्रोश निर्माण झाला आहे. या प्रकरणासाठी काँग्रेस देखील आपली भूमिका बजावत आहे. काल राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हाथरस मध्ये जाण्यासाठी रोखण्यात आलं होतं. मात्र, आज पुन्हा राहुल गांधी व प्रियंका गांधी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसमवेत हाथरस कडं निघाले आहेत. दरम्यान राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यासह पाच जणांना हाथरस मध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. यावेळी राहुल गांधी यांची गाडी स्वतः प्रियंका गांधी चालवत होत्या. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत तब्बल ३५ खासदारांचा समूह देखील यावेळी उपस्थित होता. आपल्या नेत्यांना पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या समर्थनार्थ व सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारात डीएनडी परिसरात प्रचंड गर्दी झाली होती.

उपायुक्त आयुक्त रणवीर सिंह यांच्यासमवेत नोएडाचे जॉइंट सीपी लव्ह कुमार राहुल गांधी यांच्या कारच्या जवळ पोहोचले आहेत. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्त्यांमुळं डीएनडीवर नाकेबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी राहुल यांच्या कारला चारही बाजूंनी घेरलं आहे. रणवीर सिंह राहुल गांधींशी बोलत आहेत. काँग्रेसच्या ताफ्यात समाविष्ट असलेली काही वाहने डीएनडीवर खराब झाली आहेत. त्यामुळं गर्दीची समस्या आणखीच वाढली आहे. सर्व खासदार दोन बसमध्ये बसले आहेत. नोएडा सीमेवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. डीएनडीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नोएडाचे उप पोलिस आयुक्त रणविजय सिंह कोरोना काळातील १४४ व्या अंमलबजावणीचं कारण सांगत काँग्रेस कार्यकर्त्यांना त्यांच्या घरी परत जाण्याचं आवाहन करत आहेत.

यादरम्यान प्रियंका गांधी आपल्या गाडीतून खाली उतरून कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होत्या. दुसरीकडं, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना राजधानी लखनऊमध्ये अटक करण्यात आली आहे. लखनूच्या बहुलखंडी येथील त्यांच्या घरावर देखील पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा