नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगचे आरोप आता क्रिकेट क्षेत्रासाठी नवीन राहिले नाहीत. मात्र आता खुद्द एका पाकिस्तानी खेळाडुनेच आपण स्पॉट फिक्सिंग केल्याची कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
पाकिस्तान संघाचा माजी सलामीवीर नासीर जमशेदने पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेच्या (पीएसएल) २०१६-१७ हंगामात स्पॉट फिक्सींग केल्याची कबुली दिली आहे.
इंग्लंडमधील मँचेस्टर क्राऊन न्यायालयात नासीरने आपल्यावरील आरोप मान्य केले. नासीरवर २०१८ मध्ये त्याला १० वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
तो पीएसएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सहकारी क्रिकेटपटूंना लाच देण्याच्या प्रकरणात दोषी आढळला होता.
नासीर व्यतिरिक्त युसूफ अन्वर आणि मोहम्मद एजाज या अन्य दोन जणांनी पीएसएल खेळाडूंना लाच दिल्याची कबुली दिली आहे. या तिघांच्या शिक्षेचा निर्णय फेब्रुवारीमध्ये होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे खेळाची पारदर्शकता धोक्यात आली असून क्रीडा क्षेत्राला डाग लागल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात सुरु आहे.