पुणे, ६ जुलै २०२३: हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात बुधवारी सकाळी अचानक आलेल्या पुरामुळे, हरोली भागातील एका गावातील दहा घरांचे नुकसान झाले. स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटरने ही माहिती दिली. जिल्ह्यातील एक कथित व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला आहे, ज्यामध्ये एक कार पाण्यात वाहून जाताना दिसतेय मात्र, चालकाने वेळीच वाहनातून उडी मारल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. राज्यातील अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे.
नाहानमध्ये ९२ मिमी, उना ६५ मिमी, कांगडा ४२ मिमी, पालमपूर ३२ मिमी, मंडी २८ मिमी, कुफरी २७.५ मिमी, धरमशाला २२ मिमी, नारकंडा १६.५ मिमी आणि मनालीमध्ये १४ मिमी पाऊस झाला आहे. स्थानिक हवामान खात्याने ९ जुलैपर्यंत मैदानी, खालच्या आणि मध्य पहाडी भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटाकरिता ‘यलो अलर्ट’ जारी केला असुन राज्यात ११ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
शिमला, मंडी, सिरमौर आणि सोलन जिल्ह्यात अचानक पूर येण्याची शक्यता आहे. उना येथील खाड गावात सुमारे आठ ते दहा घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राने सांगितले. हवामान खात्याने उभी पिके, फळझाडे आणि नवीन रोपांचे नुकसान होण्याचा इशारा दिला आहे. खराब हवामानामुळे पाणी आणि वीज पुरवठ्यातही व्यत्यय येऊ शकतो.
राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्राच्या आकडेवारीनुसार २४ जून रोजी मान्सून सुरू झाल्यापासून बुधवारपर्यंत राज्याचे ३०६.५८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्वाधिक नुकसान (रु. १५२.४२कोटी) झाले, त्यानंतर जलशक्ती विभागाचे १२३.१६ कोटींचे नुकसान झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात ३८ रस्ते बंद करण्यात आले होते, त्यापैकी २२ रस्ते आज रात्रीपर्यंत उघडले जाऊ शकतात. पावसानंतर कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आणि ते ७ ते १३ अंश सेल्सिअसने सामान्यपेक्षा कमी राहिले.
न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड