पूरग्रस्त नागरिकांचा तहसीलदार कार्यालयला टाळे ठोका आंदोलनाचा इशारा

5

पुणे, दि. ७ जुलै २०२०: आंबिल ओढा परिसरात पूर येऊन व नजीकच्या परिसरातील कष्टकरी कामगारांचा संसार उध्वस्त होऊन आता जवळपास १ वर्ष झाले आहे. शासन व प्रशासनाच्या भयंकर असंवेदनशीलतेच्या विरोधात परिसरातील जनतेनी ३ वेळा सनदशीर मार्गाने आंदोलन करून आपला निषेध व राग व्यक्त केला. तहसील विभागाला वेळोवेळी मदत न मिळालेल्या लोकांची यादी, लागणारी माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. तरीही पुराला वर्ष उलटत असतांना आजपर्यंत शासनाने जाहीर केलेली ‘तातडीची नुकसानभरपाई’ अनेकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. सदर गंभीर दिरंगाई वेळोवेळी तहसीलदार पुणे शहर व संबंधित तलाठी ह्यांना भेटून व पत्रव्यहार करून निदर्शनात आणून देण्यात आली.

दरम्यान कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. शासनाला कोरोनाची महामारीला आळा घालण्यात आलेल्या अपयशाने व तत्परतेने मोठ्या प्रमाणात चाचण्या, संपर्क शोध, विलगीकरण करण्यात केलेल्या दुर्लक्षामुळे देशपातळीवर व शहरातही संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले. ह्या साथीला आळा घालण्यासाठी केलेल्या नियोजनातून वस्त्यांमध्ये राहणारी कष्टकरी-कामगार जनता गायब होती. विशेषतः आपत्तीने उध्वस्त झालेल्या आणि महामारी सारख्या संकटासमोर अत्यंत असुरक्षित असणाऱ्या आंबिल ओढा परिसरात राहणाऱ्या कष्टकऱ्यांसाठी कसलीही विशेष तजवीज शासनाकडून करण्यात आली नाही.

अरुंद बोळी, लोकसंख्येचा व्यस्त प्रमाणात असणारी अत्यंत घाणेरडी संडास, दाट, एखाद्या खोलीची अत्यंत छोटी-खुरटी घरं असतांना आम्ही सुरक्षित अंतर कसे ठेवायचे होते? हातावर पोट असणाऱ्यांनी व लॉकडाऊन मध्ये उपासमार झेलणाऱ्या कष्टकऱ्यांनी सॅनिटायझर, मास्क कुठून घ्यायचे होते ? काम बंद झाली व शासना कडून सामाजिक सुरक्षेच काम बंद झाली व शासना कडून सामाजिक सुरक्षेची कसलीही व्यवस्था नसल्यामुळे कष्टकऱ्यांना अक्षरशः भुकेनी मरायला सोडण्यात आले व भिकेला लावण्यात आले.

परिसरात अनेकांना कोरोनाची लागण झाली व काहींचा बळी गेला, ह्याला जबाबदार कोण? अश्या परिस्थितही कष्टकरी जनता जबाबदारीने वागली, उपासमार व आजाराने बळी जात असतांना उद्वेगाने रस्त्यावर आली नाही. परंतु आमच्यासाठी आता अजून संयम म्हणजे भीक, मृत्यू व आप्तस्वकीयांचा बळी दणे होईल. आधीच पूर व त्याच्या व्यवस्थापनात शासन-प्रशासनाच्या गुन्हेगारी स्वरूपाच्या दुर्लक्षितते मुळे उध्वस्त झालेल्या कष्टकरी-कामगार जनतेवर आता बेरोजगारी, उपासमार, आरोग्याचे प्रश्न आ-वासून उभे आहेत. ह्यात अजूनही अनेकांना मागील पावसाळ्यातील पुराची नुकसानभरपाई मिळालेली नाही.

आता जनता उद्धवस्थ होण्याच्या पातळीवर आहे व अजून जास्त असंवेदनशीलता-दप्तर दिरंगाई सहन करू शकत नाही. जर सनदशीर मार्गानी मागण्या करून व इतकी प्रतीक्षा करूनही प्रश्न सोडवल्या जात नसतील तर तहसील कार्यालय व दांडेकर पूल भागत असणारे तलाठी कार्यालय कष्टकरी-कामगार जनतेच्या काय कामाचे? समोर आता कोणता पर्याय शासन-प्रशासनाने सोडला आहे?

त्यामुळे अत्यंत उद्वेगाने आम्ही समस्त पूरग्रस्त नागरिक, आंबिल ओढा पूरग्रस्त नागरिक संघर्ष समिती व नौजवान भारत सभेचे कार्यकर्त्यांनी ही मागणी केली, ‘की एका आठवड्यात जर आम्हाला नुकसानभरपाई मिळाली नाही व येत्या पावसाळ्यात सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली नाही तर शासन-प्रशासनाने आमच्या समोर कुठलाही मार्ग न ठेवल्यामुळे नाईलाजाने आम्ही तहसीदार व तलाठी कार्यालयाला टाळे ठोकू’. व त्या संबधित निवेदन पत्र आज तहसिलदार कार्यालयात देण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा