राज्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती

महाराष्ट्र, दि. २३ सप्टेंबर २०२०: मुंबईत काल संध्याकाळपासून ढगाळ वातावरण कायम आहे, तर अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. मुंबई शहर भागात आज ५ पूर्णांक ९ दशांश मिलिमीटर, पूर्व उपनगरात २१ पूर्णांक ७९ शतांश मिलिमीटर आणि पश्चिम उपनगरात १६ पूर्णांक ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. काल सकाळी ८ वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३७ मिलीमीटर हून जास्त पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या सर्व नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी बाजारपेठांमधे पाणी शिरलं आहे. सावंतवाडी तालुक्यात बांदा परिसरात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. औंढा तालुक्यात पिंपळदरी परीसरात अतीवृष्टीमुळे, पिंपळदरी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काल सकाळी ९ वाजता ईसापुर धरणाचा ८ क्रमांकाचा दरवाज ५० सेंटीमीटरवरून १ मीटरनं उघडला. आत्तापर्यंत धरणाच्या १३ वक्र दरवाजांमधू पैनगंगा नदीपात्रात ७६८ हून जास्त क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला आहे.

परभणीतही गेले काही दिवस पावसाची संततधार कायम असल्यानं सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातही कालपासून अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला. दुष्काळी भागात सतत गेले चार दिवस पडलेल्या पावसानं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला असला, तरी अनेक ठिकाणी खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा