पुणे,१४ जुलै २०२३ : उत्तर भारतामध्ये पावसाने थैमान घातले आहे. दिल्लीसह अनेक राज्यात पाऊस धोधो बरसत आहे. दिल्लीत यमुना नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्यामुळे, राजघाट, लाल किल्ल्यासह सुप्रीम कोर्टापर्यंत पाणी पोहोचले आहे. हरियाणा राज्यातही मागच्या काही दिवसांपासून पाऊस सतत सुरु आहे. त्याचा फटका राज्यातल्या १२ जिल्ह्यांना बसला आहे. ८५४ गावात पाणी शीरले असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.
पावसामुळे लोकांना घरातून बाहेर पडायलाही जागा नसल्यामुळे त्याचे हाल होत आहेत. वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही लोकांना खाण्यासाठी काहीच मिळत नाही, तेथे दाखल झालेले एनडीआरएफचे पथक लोकांना मदत करीत आहे. हरियाणा राज्यातील ३६७४ नागरीकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मारकंडा, घग्गर, सरस्वती या नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे १२ जिल्ह्यात सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे.
जीटी रोड बेल्टच्या सहा जिल्ह्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. अंबाला, यमुनानगर, करनाल, कैथल, कुरुक्षेत्र आणि पानीपत या जिल्ह्यातील ५८५ गावांना पूराचा मोठा फटका बसला आहे. अनेक गावांशी संपर्क तुटला आहे. ४ लाख एकरावरील सगळी पीके पूर्णपणे खराब झाली आहेत. त्याचबरोबर घग्गर नदीचे पाणी चीका शहरात शिरले आहे. त्याचबरोबर मारकंडा नदीचे पाणी शाहाबादपासून कुरुक्षेत्र पर्यंत पोहोचले आहे.
यमुनानगरच्या हथिनी कुंड बैराज या ठिकाणी पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे तिथे अधिक धोका जाणवत आहे. त्याचबरोबर कुरुक्षेत्र शहरात पाणी यूनिवर्सिटीच्या तिसऱ्या गेटपर्यंत गेले आहे, तिथे सुद्धा एनडीआरएफचे पथक लोकांना मदत करत आहे. वायुसेनेने सुध्दा अंबाला येथील सात गावातील लोकांना काल साहित्य पोहोचवले आहे. आता पाणी पलवल जिल्ह्यात पोहोचले आहे. पलवल जिल्ह्यात २४ गावात आतापर्यंत पाणी पोहोचले आहे.
हरियाणा राज्यात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. काल सुध्दा दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. करनालमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती पाण्यातून वाहून गेला आहे. हरियाणा सरकारच्या म्हणण्यानूसार कुरुक्षेत्र, करनाल, कैथल, अंबाला, फतेहाबाद, पानीपत, सोनीपत, यमुनानगर, पंचकूला या जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे लोकांचा मृत्यू झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर