पुणे विद्यापीठासमोरील उड्डाण पूल होणार जमिनदोस्त

पुणे,दि. २६ एप्रिल २०२० : सध्या कोरोनामुळे रहदारी नसल्याने अनेक रखडलेली कामं मार्गी लावण्यास राज्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. अशाच पद्धतीने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.

पुणे विद्यापीठाच्या अगदी गेटच्यासमोर असलेला हा पूल विचित्र पद्धतीने बांधण्यात आला होता. आता इथून जाणाऱ्या हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी देखील हा पूल अडचणीचा ठरत होता. त्यामुळे हा उड्डाणपूल पाडून याठिकाणी वाहने आणि मेट्रोसाठी दुमजली उड्डाणपूल उभारण्यास अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.

कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता पुण्यात लॉकडाऊन आणखी काही काळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या दृष्टीने हा अत्यंत चांगला कालावधी आहे. टाटा कंपनीनेही या कामासाठी तयारी दर्शवली आहे. नवीन पुलासाठी २५०कोटींचा खर्च येणार असून तो उभारण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागणार आहे.

भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करुन हा पूल आताच पाडणे सोयीस्कर ठरणार असल्याच्या मुद्द्यावर अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीत सहमती दिली आहे.त्यामुळे पुणे विद्यापीठसमोरचा उड्डाण पूल लवकरच पाडण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा