मुंबई, १८ मे २०२३ : काल बुधवारी १७ मे ला राष्ट्रवादी काँग्रेसची कोर कमिटीची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मागील निवडणुकीमध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या जागा नेमक्या किती आहेत. कोणते मतदारसंघ आहेत आणि या जागांवर विजयी उमेदवार कोण आहेत. यावर बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे समजते
२०१९ ला पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील २८८ मतदारसंघापैकी ४८ मतदारसंघामध्ये क्रमांक दोनची मते मिळाली होती. तर लोकसभेच्या ४८ मतदारसंघांपैकी १५ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली आहेत.
विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर राष्ट्रवादीच्या बहुतेक लढती या शिवसेनेसोबत झाले आहेत. राज्यातील ४८ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली आहेत. यातील १८ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत ही शिवसेनेसोबत झाली होती. तर लोकसभेच्या निवडणुकीचा विचार केला तर राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला क्रमांक दोनची मते मिळाली होती. यापैकी आठ मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची लढत शिवसेनेसोबत झाली होती.
लोकसभा आणि विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या क्रमांक दोनच्या जागांचा विचार केला, तर बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीची लढत ही शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या विरोधात झालेली दिसते. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर