३१ मार्च नव्हे तर पुढील आदेश पर्यंत सूचनेचे पालन करावे

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशासह नागपूर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या चार शहरांमध्ये अन्नधान्य, दूध, औषधे या सारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने व कार्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील. त्यामुळे कोणीही बाहेर फिरायला जाऊ नका. असे आत्तापर्यंत सांगितले जात होते. राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी संपूर्ण पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ३१ मार्च नाही तर पुढील आदेश मिळेपर्यंत सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

राज्यातील सर्व नागरिक, व्यापारी, उद्योजकांनी सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. लोकांनी घरामध्येच थांबून कामं करावी. सर्वांनी सावध रहावे. राज्यावर किंवा देशावर संकट येते त्यावेळी सर्वांनी एकजुटीने त्याचा सामना करायला पाहिजे, असे अजित पवारांनी सांगितले. तसंच गर्दी आणि प्रवास टाळा. त्याचसोबत लग्न समारंभ, अंत्यविधी, दहावा-तेराव्याला गर्दी करु नका. शक्य असेल तर लग्न समारंभ पुढे ढकला, असे आवाहन त्यांनी केले.

ही फिरण्यासाठीची सुट्टी नसून हे आपणच आपल्यावर घातलेले एकप्रकारचे बंधन आहे. त्यामुळे घरातच बसा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांतील संख्या ५० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर आणल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, चार शहरांमधील बंद ३१ मार्च नव्हे, तर पुढील आदेश येईपर्यंत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा