Forbes Real Time Billionaires List, 5 फेब्रुवारी 2022: जगभरातील शेअर बाजारातील सततच्या घसरणीचा प्रमुख अब्जाधीशांच्या संपत्तीवर मोठा परिणाम झालाय. यामुळं अब्जाधीशांच्या क्रमवारीतही बदल झालाय. या गोंधळात अदानी समूहाचे गौतम अदानी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भूतकाळातही ते मुकेश अंबानींना हरवण्याच्या जवळ आले होते, पण पुढं जाऊ शकले नाही. आता गौतम अदानी जगातील 10 श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनले आहेत.
फोर्ब्सच्या रिअल टाइम यादीनुसार, गौतम अदानी आणि कुटुंब सध्या $ 90 अब्ज संपत्तीसह 10 व्या क्रमांकावर आहे. गेल्या 24 तासांत त्यांची संपत्ती $672 दशलक्षने कमी झाली असली तरी, इतर अव्वल अब्जाधीशांना याचा अधिक फटका बसला आहे. दीर्घकाळ भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या 1 दिवसात 2.2 अब्ज डॉलरची घट झाली आहे. यामुळं त्यांची एकूण संपत्ती $89 अब्ज झाली. मुकेश अंबानी आता जागतिक स्तरावर 11 व्या क्रमांकावर आणि भारत आणि आशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
अदानी, अंबानी या दोघांच्याही मागं झुकेरबर्ग
फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुरुवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 26 टक्के घसरण झाल्यामुळं झुकरबर्ग यांची संपत्ती $29.7 बिलियन चं नुकसान झालं. अशा प्रकारे त्यांची एकूण संपत्ती $84.8 बिलियनवर आली. ते सध्या अदानी आणि अंबानी यांच्यानंतर 12 व्या क्रमांकावर आहेत.
नुकसान असूनही मस्क पहिल्या क्रमांकावर
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनाही शेअर बाजारातील ताज्या घसरणीचा फटका बसलाय. गेल्या 1 दिवसात मस्क यांच्या संपत्तीत $3.3 अब्जची घट झालीय. मस्क अजूनही $ 232.3 अब्ज संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांनाही मोठा फटका बसला असून ते 1 स्थान घसरून तिसर्या स्थानावर आले आहे. बेझोस यांची संपत्ती आता $11.8 बिलियनने कमी होऊन $164.8 बिलियन झालीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे