तेरा लोकांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

भंडारा, १३ ऑक्टोबर २०२२ : विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये उच्छाद घातलेल्या सीटी १ या नरभक्षक वाघामुळे वनविभागाला चांगलेच हैराण केले होते. मागील तीन महिन्यांपासून ताडोबातील विशेष पथक या वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. परंतु यात यश मिळत नव्हते. आता अखेर या वाघाला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे.

भंडाऱ्यासह गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यात १३ लोकांचे जीव या नरभक्षक सीटी १ वाघाने घेतले होते. त्याला आज गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे जेरबंद करण्यात आले. या नरभक्षक वाघामुळे परिसरातील नागरिक प्रचंड दहशतिच्या छायेखाली होते. त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. वनविभागानेही यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. अखेर आज या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

आज सकाळी करण्यात आलेल्या या कारवाईमूळे वनविभागासह नागरिकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. या वाघाने देसाईगंज जवळच्या एका गाईवर दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यामुळे वाघ तिथे पुन्हा येण्याची खात्री होती.त्यामुळे वनविभागाची ताडोबा येथून बोलावण्यात आलेले पथक त्याच्यावर पाळत ठेवून होते. वाघाला तिथे येण्यासाठी जवळच शिकार म्हणून दुसरी एक गायही बांधण्यात आली होती.

हा नरभक्षक वाघ आज सकाळी वनविभागाच्या सापळ्यात अडकला. वाघ तिथे येताच शूटर टीमने त्याच्यावर बेशुद्धीचे इंजेक्शन डागले. आता या नरभक्षक वाघाला पिंजऱ्यामध्ये बंद करून ठेवले जाणार आहे. नरभक्षी वाघाला पकडण्यात अखेर यश आल्याने परिसरातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनी आता समाधान व्यक्त केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा