पुरंदर, दि. १९ जून २०२०: श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधुराज संत सोपानकाका यांच्या पालखी सोहळ्याचे काल सासवड येथून औपचारिक प्रस्थान करण्यात आले. आज संत सोपानकाका यांच्या पादुका मानकरी केंजळे यांच्या हस्ते पालखीमध्ये ठेवण्यात आल्या. मंदिराला पालखी प्रदक्षिणा घालून सोपानकाका पालखी सोहळ्याचे औपचारिक प्रस्थान करण्यात आले.
श्री संत सोपानकाका पालखी सोहळा वारी सोहळ्यातील संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सोहळ्या नंतरचा तिसरा मोठा पालखीसोहळा म्हणून ओळखला जातो. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पायी पालखी सोहळा रद्द करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार आता पालखी सोहळा पायी न जाता हा सोहळा बसमधून निवडक लोकांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे जाणार आहे.
एकादशी दिवशी हा सोहळा पंढरपूर मध्ये जाणार असला तरी तो पर्यंत या पादुका सोपानकाका मंदिरातील पालखीत राहणार आहेत. हा पालखी सोहळा पंधरा ते वीस लोकांचा उपस्थितीत पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. दरवर्षी आजच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानकाका या बंधूंचा बंधू भेटीचा सोहळा सासवड मध्ये होत असतो. मात्र यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड येथे आला नाही. त्यामुळे बंधू भेटीचा हा सोहळा झाला नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे