ICICI च्या माजी CEO चंदा कोचर यांना पती दीपक कोचरसह अटक, CBI ची मोठी कारवाई

नवी दिल्ली, २४ डिसेंबर २०२२: व्हिडिओकॉनला कर्ज प्रकरणी सीबीआयनं मोठी कारवाई केलीय. तपास यंत्रणेनं शुक्रवारी संध्याकाळी ICICI बँकेच्या माजी एमडी आणि सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली. चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख असताना त्यांनी व्हिडिओकॉन समूहाला कर्ज दिलं, असा आरोप आहे. या बदल्यात चंदा यांचे पती दीपक कोचर यांच्या नु रिन्युएबल कंपनीला व्हिडिओकॉनकडून गुंतवणूक मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये व्हिडिओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेनं कर्ज दिलं होतं. जे नंतर एनपीए झालं आणि नंतर त्याला “बँक फ्रॉड” म्हटलं गेलं. सप्टेंबर २०२० मध्ये अंमलबजावणी संचालनालयानं दीपक कोचरला अटक केली. खरं तर, २०१२ मध्ये, चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखालील ICICI बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला ३,२५० कोटींचं कर्ज दिलं आणि सहा महिन्यांनंतर वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या मेसर्स सुप्रीम एनर्जीनं मेसर्स न्यूपॉवर रिन्युएबल्सला ६४ कोटींचं कर्ज दिलं. ज्यात दीपक कोचर यांचा ५०% हिस्सा आहे.

ICICI बँक आणि व्हिडिओकॉनचे शेअरहोल्डर अरविंद गुप्ता यांनी पंतप्रधान, रिझर्व्ह बँक आणि सेबीला पत्र लिहून व्हिडिओकॉनचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत आणि ICICI सीईओ आणि एमडी चंदा कोचर यांच्यावर एकमेकांची बाजू घेत असल्याचा आरोप केलाय. धूत यांच्या कंपनी व्हिडिओकॉनला आयसीआयसीआय बँकेकडून ३,२५० कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आणि त्या बदल्यात धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या नुपॉवर या पर्यायी ऊर्जा कंपनीमध्ये त्यांचे पैसे गुंतवले.

अशाप्रकारे चंदा कोचर यांनी वेणुगोपाल धूत यांना पतीच्या कंपनीसाठी फायदा करून दिल्याचा आरोप आहे. २०१८ मध्ये हा खुलासा झाल्यानंतर चंदा कोचर यांना बँकेचा राजीनामा द्यावा लागला होता. सीबीआयने यापूर्वी फेब्रुवारी २०१८ मध्ये या प्रकरणी प्राथमिक चौकशी (पीई) नोंदवली होती.

२०१९ मध्ये न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण समितीचा अहवाल आला. कोचर यांनी व्हिडिओकॉनला कर्ज देताना बँकेच्या आचारसंहितेचा भंग केल्याचं समितीच्या चौकशीत आढळून आलं. कोचर यांच्या मान्यतेवर या कर्जाचा काही भाग त्यांचे पती दीपक यांच्या मालकीच्या कंपनीला देण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा