माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन

मुंबई, दि. १६ जुलै २०२० : राज्याच्या माजी निवडणूक आयुक्त निला सत्यनारायण यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला राज्य निवडणूक आयुक्त होत्या. २००९ साली त्यांची या पदावर नेमणूक झाली होती. नीला सत्यनारायण १९७२ च्या आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. ३७ वर्ष आय ए एस म्हणून देशाची सेवा केल्यानंतर त्यांची राज्याच्या निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले होते. मराठी साहित्यात रमणाऱ्या सत्यनारायण यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या होत्या. अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखनही केले होते. काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी संगीत दिग्दर्शनही केले होते. सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा’ हा मराठी चित्रपट निघाला. याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

नीला सत्यनारायण यांनी एकदा आपला अनुभव सांगताना, “लहानपणापासूनच रंगमंचावर काम करण्याची माझी इच्छा होती. मात्र, आयएसआय होण्यासाठीचे बळ पतीने दिले आणि त्यामुळे आयएसआय झाले,” असे सांगितले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा