माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची गळफास लावून आत्महत्या

शिमला, ८ ऑक्टोंबर २०२०: माजी राज्यपाल, केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी संचालक आणि हिमाचल प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) अश्विनी कुमार यांनी बुधवारी आत्महत्या केली. शिमला येथील घरात फाशी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. अश्विनी कुमार ऑगस्ट २००८ ते नोव्हेंबर २०१० या काळात सीबीआयच्या संचालक पदावरही होते. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली.

अश्विनीकुमार यांचा मृतदेह ब्राकहास्ट, शिमला येथील राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. हिमाचल प्रदेशच्या माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी हे भयानक पाऊल का उचललं हे अद्याप समजू शकलं नाही. मात्र, एसपी शिमला मोहित चावला यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांचं पथक घटनास्थळी गुंतलेलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तथापि, हिमाचलचे डीजीपी संजय कुंडू यांचं म्हणणं आहे की, कुमार यांनी कुटुंबातील सदस्यांशी संभाषण केलं आहे आणि ते कोणत्याही प्रकारे नैराश्यात असल्याचं सूचित होत नाही. तर पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट देखील जप्त केली आहे. ज्यात लिहिलं आहे की, मी माझ्या आयुष्याला कंटाळून पुढील प्रवासासाठी एकटा निघालो आहे. या आत्महत्येच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे.

माजी भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी अश्विनी कुमार मणिपूर आणि नागालँड राज्याचे राज्यपाल देखील होते. यापूर्वी अश्विनी ऑगस्ट २००६ ते जुलै २००८ पर्यंत पोलिस महासंचालक होते. नंतर ते सीबीआयचे संचालकही बनले आणि त्यांनी हे पद २ वर्षाहून अधिक काळ सांभाळलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा