माजी गटनेते राहुल कलाटे शिंदे गटाच्या वाटेवर

पिंपरी, १७ जुलै २०२३ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी रात्री मुंबईत भेट घेतली. भेट घेतल्यानंतर राहुल कलाटे हे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. राहुल कलाटे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल होणार आहेत. कलाटे यांचा शिंदे गटातील प्रवेश हा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील भेटी दरम्यान, कलाटे यांच्यासोबत माजी नगरसेवक नवनाथ जगताप हे उपस्थित होते. काही माजी नगरसेवकदेखील कलाटे यांच्यासोबत शिवसेनेत जाणार आहेत. तसेच माजी नगरसेवक जगताप, माजी नगरसेविका अश्विनी वाघमारे, संपत पवार हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हंटले जात आहे. या विषयावर उद्योगमंत्री उदय सामंत बोलले की, कलाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. तसेच स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांच्यासोबत चर्चा करून दिशा ठरविणार आहे. त्यांच्यासारखा चांगला सहकारी भविष्यात मिळत आहे. याचा मनापासून आनंदच आहे. कलाटे यांचा करिष्मा आहे. त्यांच्या सोबत येणारे सहकारी, विकासाच्या कामाला गती देतील.

राहुल कलाटे हे २००२ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली, त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली २०१७ मध्ये पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. त्यांनी वाकड विभागाचे प्रतिनिधित्व पालिकेत केले. ते शिवसेनेचे गटनेते, आणि शहरप्रमुख होते. त्यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित आघाडीच्या पाठिंब्यावर चिंचवडमधून विधानसभा निवडणूक लढविली. यात त्यांनी भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज दिली.

दिवंगत आमदार जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी महाविकास आघाडीतून बंडखोरी करून निवडणूक लढविली. पण यावेळी कलाटे यांची रक्कम जप्त झाली होती. तसेच शिंदे-फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच कलाटे यांनी बंडखोरी केल्याचे सांगितले जात आहे. पण आता कलाटे यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा