माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मंजूर पण सुटका नाही

मुंबई, ५ ऑक्टोंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रसचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडीकडून दाखल गुन्ह्यात ११ महिन्या पासून जामीनासाठी प्रयत्न केला होता, पण त्यांना जामीन मिळू शकला नव्हता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने त्यांना दिलासा देत जामीन मंजूर केला आहे पण त्यांना अजूनही सुटका नाही.

१०० कोटींच्या वसुलीचा आरोप असलेल्या देशमुख यांना ईडीने अटक केली होती. नोव्हेंबर २०२१ पासून जवळपास ११ महिने अनिल देशमुख यांनी तुरुंगात काढले असून त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुख यांना १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र न्यायालयाने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्यानंतर सीबीआयनेही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्यातही त्यांना जामीन मिळेपर्यंत देशमुख तुरुंगातच असणार आहेत.

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सध्या अटकेत असलेले माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीनेदेखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

तसेच ईडीच्या म्हणण्यानुसार, निलंबित करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली होती, ते नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला हे पैसे सोपवले होते. हे पैसे हवाला चॅनेलद्वारे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.

अनिल देशमुख यांना सीबीआयकडून दाखल गुन्ह्यातही लगेच जामीन मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या निर्णयाकडे आत्ता लक्ष लागलेले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा