मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा

मुंबई, ३० ऑगस्ट २०२३ : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या एका कंपनीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला. को-लोकेशन स्कॅम प्रकरणी हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. हा खटला पुढे चालवण्याएवढे पुरेसे पुरावे आपल्याकडे नसल्याचे सीबीआयने आपल्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. त्यामुळे संजय पांडे यांच्या समोरील मोठी अडचण कमी झाली आहे.

संजय पांडे यांच्या आयसेक कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला होता. आयसेकनं ऑडिट केलेल्या २ स्टॉक-ब्रोकर्सचं ऑडिट केलं होतं. या ऑडिटमध्ये अनेक गैरप्रकार आढळल्याचा आरोप सीबीआयनं केला होता. मात्र पुरेसे पुरावे न सापडल्यानं आता सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. कोर्ट हा रिपोर्ट स्वीकारतं की नाकारतं ते १४ तारखेच्या सुनावणीत कळणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त असलेल्या संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या आय सेक सर्विसेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. को-लोकेशनच्या मदतीने NSE मधील अल्गोरिथामिक ट्रेडिंग करणाऱ्या दलालांचे ऑडिट करताना, सेबी नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप या कंपनीवर करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याची चौकशीही सुरू होती. को-लोकेशन स्कॅम प्रकरणी NSE च्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्णा यांना देखील अटक झाली होती.

प्रकरण काय?
संजय पांडे यांनी २००१ मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला होता, पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. त्यानंतर त्यांनी आयटी कंपनी सुरू केली होती. मात्र काही काळानंतर ते पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. त्याच वेळी त्यांच्या मुलाला कंपनीचे संचालक बनवण्यात आले. २०१० ते २०१५ दरम्यान, Isaac Services Pvt Ltd कंपनीला एनसीई सर्व्हर आणि सिस्टम सिक्युरिटीसाठी कंत्राट देण्यात आलं होतं. एनएसई घोटाळ्यात फोन टॅपिंगसाठी वापरण्यात आलेले फोन टॅपिंग मशिन हे संजय पांडे यांच्या आयटी कंपनीनं इस्राएलमधून मागवले असल्याचा आरोप आहे.

या मशिनच्या माध्यमातून एनएसईचे अधिकारी कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग करत होते. फोन टॅपिंगच्या माध्यमातून इत्यंभूत गोपनीय माहिती ही या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी एनएसई प्रमुख चित्रा रामकृष्णन यांना दिली जात होती. यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे महत्त्वाचे पुरावे सीबीआय आणि ईडीला मिळाले असल्याचंही बोललं जात होतं. याचप्रकारणी संजय पांडे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. अखेर आता त्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या कंपनीविरोधात सीबीआयनं केस दाखल केली होती. या केसचा क्लोजर रिपोर्ट सीबीआयन ने विशेष कोर्टासमोर सादर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा