पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे यांचा, उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

पुणे, १५ मे २०२३ : पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. पुरंदरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अशोक टेकवडे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.अशोक टेकवडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच निकाल आलेल्या कर्नाटकातील विजयानंतर महाविकास आघाडीत जल्लोष साजरा केला जात आहे. परंतु पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीच्या या जल्लोषावर पाणी फिरताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक टेकवडे हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. टेकवडे हे पुरंदरमधील मोठं नाव आहे. ते २००४ ते २००९ या कालावधीत पुरंदरचे आमदार होते. त्यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पक्ष बदलामुळे पुरंदरमधील राजकीय गणिते बदलणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

टेकवडे हे मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत नाराज होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत फार काळ राहतील असे वाटत नव्हते. अशोक टेकवडे हे पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. तशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यांनी गेल्या महिन्यात जिल्हाध्यक्षांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्या पत्रात त्यांनी पुरंदर तालुकाध्यक्षांची तक्रार केली होती. तालुकाध्यक्षांवर टेकवडे यांनी या पत्रातून गंभीर आरोप केले होते. तसेच अध्यक्ष बदलण्याची मागणीही केली होती.

टेकवडे यांच्या नाराजीमुळे ते आज ना उद्या ते पक्ष सोडतील अशी पुरंदरमध्ये दबक्या आवाजात चर्चा होती. अखेर या नाराजीतूनच त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपला पुरंदरमध्ये मोठे बळ मिळणार आहे. अशोक टेकवडे यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा